| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नेरळ जवळील कोदिवले येथील शेतकरी अमर मिसळ यांचे मध्यरात्री घर कोसळल्याची घटना घडली असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सततधार पावसामुळे घराला मोठे तडे गेले होते. घराच्याकडेला असलेली जमीन खचल्याने घराचा किचन भाग मुख्य घरापासून वेगळा झाला आणि तो कोसळण्याच्या स्थितीत होता. मध्यरात्री भिंतीचा मोठा आवाज झाल्याने घरातील मंडळी जागी झाली. नागरिकांच्या वेळीच सतर्कतेमुळे घरातील वस्तू बाहेर काढण्यात आल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला शिवाय सामानाची हानी होण्यापासून रोखण्यात आली. मात्र, या घटनेनंतर शेतकरी मिसाळ कुटुंबाचे घर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे. अगोदरच तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अमर मिसळ यांच्यावर घर कोसळल्याने संकटाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांचे शेतीचे झालेले नुकसान आणि मिसळ कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.







