शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख

| पनवेल | वार्ताहर |

कळंबोली वसाहतीमधील गुरुव्हिला सोसायटीतील बंद घरात शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाले. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. घरात दोन गॅसचे सिलिंडर होते. मात्र, शेजार्‍यांनी वेळीच प्रसंगावधान राखून घराचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाला पाचारण केल्याने अनर्थ टळला. कळंबोलीचे अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4मध्ये असलेल्या गुरुव्हिला सोसायटीतील डी विंगमधील 303 क्र. सदनिका किशोर काना पाटील यांच्या मालकीची आहे. या घरात बिपिन सिंह हे भाड्याने राहात आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी घरातील काम आटोपून बाजारहाट करण्यासाठी बाहेर गेले असता, घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घर बंद अवस्थेत असल्याने घरातूनच धुराचे लोट व आगीच्या ज्वाला बाहेर खिडकीतून येऊ लागल्या. प्रसंगावधान राखून शेजारी राहत असलेल्या हेमंत पिसे यांनी व अन्य दक्ष नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सोसायटीचे सचिव उमाकांत गव्हाणे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले व घरात प्रवेश करून गॅसचे दोन सिलिंडर बाहेर काढून ते निकामी केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Exit mobile version