कासार आळी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र सामानाचे नुकसान

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील कासार आळी येथील प्रशांत लिमकर यांच्या घरी पहाटे आठ वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली. बाहेरून जाणार्‍या नागरिकांना घरातून धूर बाहेर येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ प्रशांत लिमकर यांना आवाज दिला. लिमकर व घरातील सदस्यांनी त्वरित घरातील पाण्याच्या साहाय्याने आग विझवली व महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली.

सुदैवाने, शॉर्टसर्किट झाला त्यावेळी घरातील सर्व सदस्य वरच्या खोलीत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, खालच्या खोलीत प्रशांत लिमकर यांच्या पत्नीचे कपडे शिलाईचे दुकान असल्याने शिलाईसाठी आलेल्या साड्या, ब्लाऊज यांसह विविध साहित्य आगीत जळून जवळपास पंचवीस हजारांचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version