महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू
I पनवेल I राज भंडारी I
प्रकल्पग्रस्तांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत तसेच इतर महत्वाच्या मागण्यांबाबत आज महत्वाची चर्चा व निर्णय होणार आहे. रविवारी पार पडलेल्या बैठकीनंतर आज सोमवारी या मुद्द्यांवर विशेष निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि सिडकोच्या विरोधातील जनतेचा रोष पाहता पनवेल उरण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या दीड वर्षांपासून सुरू केलेल्या पाठपुराव्याला आज यश मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेले वचन आजच्या बैठकीमध्ये सफल होणार असल्याचे चित्र आहे.
आज सुरू असलेल्या बैठकीसाठी स्व. दि. बा. पाटिल स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटिल ह्यांच्या नेतृत्वात आमदार बाळाराम पाटिल, मा. आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस प्रशांत पाटिल, कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सतिश पाटिल, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिषजी घरत आदी नेते आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची वर्षा ह्या निवासस्थानी भेट घेत आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता या नेत्यांनी वर्तविली आहे.