पंतप्रधान किती वेळा माफी मागणार

खा. राहुल गांधी यांचा उपहासात्मक प्रश्‍न
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
किसान आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत केंद्र शासनवार निशाणा साधला आहे. देशातील जनता, यात प्रामुख्याने शेतकरी बांधव यांच्या हालअपेष्टा यांच्यासाठी पंतप्रधान अखेर किती वेळा माफी मागणार, असा उपहासात्मक प्रश्‍न त्यांनी अधिवेशप्रसंगी उपस्थित केला आहे.
याशिवाय, शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित करत, सरकारने मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच, सत्याग्रही शहीद शेतकर्यांच्या नावे नुकसान भरपाई न देणे, नोकर्‍या न देणे, अन्नदात्यांवरील पोलीस खटले मागे न घेणे या मोठ्या चुका ठरतील. शेवटी पंतप्रधान किती वेळा माफी मागणार? असे ट्विटदेखील राहुल गांधी यांनी केले आहे.
ऐन थंडीच्या हंगामात राजधानीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशानामुळे राजकीय तापमान उच्चांक गाठेल, असे चित्र आहे. कारण विरोधक केंद्रातील मोदी शासनाला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारची कोंडी करण्याचा ठाम निर्धार केलेले विरोधी बाकावरच्या सर्व राजकीय नेत्यांनी शासनाला विविध मुद्द्यांवर लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. अर्थातच, केंद्रातील मोदी सरकार त्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. तुर्तासतरी संसदेत राहुल गांधी मोदी सरकारवर आपला घणाघात साधताना दिसत आहेत.
संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना नोकर्‍या आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी माझी इच्छा आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात जवळपास 700 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश आणि शेतकर्‍यांची माफी मागितलेली आहे. त्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांच्याकडून चूक झाली. 30 नोव्हेंबर रोजी कृषि मंत्र्यांना विचारण्यात आलं होतं की, आंदोलनात किती शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, माझ्याकडे याबाबत काही आकडेवारी नाही.
याचबरोबर राहुल गांधी यांनी हे देखील म्हटले की, जर सरकारकडे काही माहिती नाही तर आमच्याकडून यादी घ्यावी. मी संसदेत आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची संपूर्ण यादी ठेवत आहे. पंजाब सरकारने 400 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. याशिवाय 152 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देखील देण्यात आली आहे. माझ्याकडे पूर्ण यादी आहे. याशिवाय आम्ही हरियाणाच्याही 70 शेतकर्‍यांची यादी तयार केली आहे. आणि तुमचे सरकार म्हणते की मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची यादी नाही.

Exit mobile version