पादचार्‍यांनी रस्ता ओलांडायचा कसा?

गतिरोधक नसल्याने जीव धोक्यात

| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ता सध्या सुसाट बनला आहे. मात्र, बांधकाम विभागाने रहदारी ठिकाणी गतिरोधक न बसवता पादचार्‍यांचा जीव धोक्यात घातला आहे.

बोर्लीपंचतन बाजारपेठ रस्त्यावरील जुना पोस्ट नाका चौकात रस्ता ओलांडायचा म्हटलं की, अंगावर अक्षरशः काठा उभा राहतो. सकाळी आणि सायंकाळी दहा ते पंधरा मिनिटे ताटकळत उभे राहिल्यानंतर जीवघेणी कसरत करीत रस्ता ओलांडावा लागतो. यामध्ये अचानक वेगात येणार्‍या वाहनांच्या कित्येक पादचार्‍यांना धडक बसल्या आहेत. त्यामुळे साहेब, तुम्हीच सांगा पोस्ट नाका चौक ओलांडायचा कसा, असा प्रश्‍न पादचारी विचारत आहेत.

या रस्त्याच्या दुतर्फा किराणा तसेच अनेक आवश्यक वस्तूंची मोठी दुकाने आहेत. याशिवाय या चौकातून गावातील वस्तीत जाण्यासाठी दोन अंतर्गत रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण बांधकाम विभागाच्या अखत्यारीत करण्यात आले. काम पूर्ण होऊन महिना होत आहे. मात्र, नागरिकांची गतिरोधकाची मागणी असूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे.

बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीमध्ये 22 मार्चला ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व संघटनेकडून गतिरोधकाची मागणी करण्यात आली. मात्र, इकडे सबंधित अधिकारी अद्याप फिरकलेच नाही.

Exit mobile version