घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं ? वाचा सविस्तर

 महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते. (How to get caste certificate from Aaple Sarkar Portal )

जातीचे प्रमाणपत्र ( Caste) कुठे मिळते?

जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा :पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे

जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.

जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती पाहण्यासाठी क्लिक करा

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागते.

स्वंयघोषणापत्र

जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते. तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी. 18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी. अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

21 दिवसांमध्ये प्रमाणपत्र

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांपर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

Exit mobile version