सतत चुका करत राहिलो तर जिंकणार कसे?

द. आफ्रिकेतील पराभव केएल राहुलच्या जिव्हारी
। केपटाऊन । वृत्तसंस्था ।

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरीजमधील शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताला पराभूत करत भारतावर क्लीन स्विप विजय मिळवला आहे. मात्र हा पराभव केएल राहुलच्या जिव्हारी लागला आहे. सतत चुका करत राहिलो तर जिंकणार कसे?, असे म्हणत त्याने संघाने केलेल्या चुकांचा पाढा वाचला आहे.
केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने भारतावर 4 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचं आव्हान दिले होतं. हे आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही. टीम इंडिया 49.2 षटकांमध्ये सर्वबाद 283 धावांपर्यंत मजल मारु शकली. या विजयासह द. आफ्रिकेने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे.
याआधी उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेली कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. दरम्यान, द. आफ्रिकेतील पराभव कर्णधार केएल राहुलच्या जिव्हारी लागला आहे.
केएल राहुल असा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे, ज्याने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतले पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. हा लाजिरवाणा रेकॉर्ड बनवल्यानंतर राहुल शांत कसा बसेल. त्याने या पराभवाची वेगवेगळी कारणं मांडली आहेत. मधल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाजांवर त्याने पराभवाचं खापर फोडलं आहे.
याबाबत व्यक्त होताना केएल राहूल म्हणाला की, तुम्हाला यश हवं असेल तर तुम्ही तुमच्या चुकांची पुनरावृत्ती करणं टाळलं पाहिजे. भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विराट कोहलीला एकदा सांगितले होते की, तुला जर तुझ्या क्रिकेट कारकीर्दीत यशस्वी व्हायचं असेल तर तुझ्या दोन चुकांमध्ये किमान सहा महिन्यांचं अंतर असायला हवं.
पण द. आफ्रिका दौर्‍यावर राहुल अनेक चुका पुन्हा पुन्हा करताना दिसला. तर दुसर्‍या बाजूला संघातील इतर सहकार्‍यांनीदेखील सातत्याने चुका केल्या. त्यामुळे राहुल म्हणाला की, जर तुम्ही चुकांवर चुका करत असाल तर संघाला सतत पराभूतच व्हावं लागेल. केपटाऊनमधील क्लीन स्वीप पराभवानंतर संघाने केलेल्या चुकांचा राहुलने पाढा वाचला.


गोलंदाजांची लाइन-लेंथ खराब
केएल राहुलने आपल्या गोलंदाजांनाही धारेवर धरलं. तो म्हणाला, आमच्या गोलंदाजांनी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आमच्या गोलंदाजांनी तीच चूक केली. आम्ही पॉवर प्लेमध्ये विकेट घेऊ शकलो नाही. तेच आमच्या पहिल्या सामन्यातील पराभवामागचं प्रमुख कारण होतं. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना खेळपट्टीचा अंदाज घेता आला, मैदानात सेट होता आलं.

Exit mobile version