1 जुलैपासून एचएसआरपी बंधनकारक

नियम मोडल्यास दंड; जुन्या वाहनांसाठी 30 जूनपर्यंत मुदत

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीनंतर म्हणजेच 1 जुलै 2026 पासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वाहनधारकांना एचएसआरपी बसविण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कामाचा वेग आणि वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनचोरी, बनावट नंबर प्लेट्सचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी एचएसआरपी प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जुन्या वाहनांनाही ही नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Exit mobile version