। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शासनाने जुन्या सर्वच वाहनांच्या नंबरप्लेट नवीन एचएसआरपी करण्याचा सक्तीचा निर्णय केला आहे. मात्र, जुन्या वाहनधारकाला हे त्रासदायक ठरत आहे. आरटीओ विभागाकडून 1 एप्रिलपासून नवीन एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने रस्त्यावर फिरल्यास वाहनधारकांना दंड बसणार आहे. या नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी दुचाकीला 450 रुपये आणि चारचाकी 750 रुपये आकारले जाणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत दुप्पट खर्च वाहनधारकांना सोसावा लागणार आहे.
या कामासाठी शासनाने तीन विभाग केले असून, त्याचा ठेका तीन वेगवेगळ्या कंपन्यांना दिला आहे. या निर्णयामुळे या व्यवसायात पूर्वीपासून असणार्या सामान्य कारागिरांवर अन्याय होणार आहे. या नंबरप्लेटसाठी अर्ज आणि रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक विभागाच्या अथवा या कंपन्यांच्या वेबसाइटवरूनच भरता येणार आहे. वाहनांच्या नंबरप्लेट अगोदर साध्या काळ्या, पांढर्या, पिवळ्या रंगाने लिहिलेल्या असायच्या, त्यानंतर त्या रेडियममध्ये आल्या. 2019 पासून शासननिर्णयानुसार त्या एम्बॉस्ड करण्यात आल्या आहेत.