अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात; 3,283 ग्राहकांनी घेतला लाभ
। ठाणे । प्रतिनिधी ।
दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्राने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज’ योजनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या योजनेचा महावितरणच्या भांडुप व कल्याण परिमंडळातील 3 हजार 283 ग्राहकांनी लाभ घेतला आहे.
घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसविता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध झाली आहे. यासह कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणार्या ग्रामपंचायत यांनाही प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. त्याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यात येत आहे. तसेच, सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत भांडुप परिमंडळांतील तब्बल 1 हजसा 899 ग्राहकांनी, तर कल्याण परिमंडळांतील 1 हजार 384 ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी आपापल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे.
कमाल 90 लाखांपर्यंत अनुदान
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षाही जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये थेट अनुदान मिळत आहे. याबरोबरच गृहनिर्माण संस्था, घर संकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आणि सामायिक उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.