। ठाणे । प्रतिनिधी ।
माळशेज घाटात एसटी आणि स्कॉर्पियो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 5) सकाळी साडेअकराच्या दरम्यान कल्याणहून अहिल्यानगरकडे एसटी महामंडळाची बस जात होती. तर याच वेळी माळशेज घाटाकडून मुरबाडच्या दिशेने स्कार्पिओ वाहन येत होते. वैशाखरे गावापासून काही मीटरच्या अंतरावर एका तीव्र वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. यामध्ये स्कॉर्पिओतील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने टोकावडे रुग्णालयात दाखल केले.






