। अकोला । प्रतिनिधी ।
सध्या राज्यात नसरापूरच्या आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केला आहे. पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हती. मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
पर्वती भागात आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न
पुण्यातील पर्वती पायथ्याजवळील एक धक्कादायक घटना समोर आली. 70 वर्षीय आजोबाने सख्ख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नराधम आजोबावर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सदर प्रकरणी चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती समोर आली आहे. नातू आणि नात आरोपी आजोबाला भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातवाला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असे सांगितले. नंतर आरोपीने नातीच्या अंगावरील कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरीलही कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.






