। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरा जवळील नातेखिंड उड्डाणपुलाखाली मुंबईकडून महाडकडे येणाऱ्या सर्विस रोडवर सकाळच्या सुमारास बोरिवली- महाड या राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बस आणि एका ऑटो रिक्षामध्ये जोरदार धडक झाली आहे. यामध्ये रिक्षाचालक गणेश कदम राहणार मोहोप्रे, महाड हे सुदैवाने बचावले आहेत. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एसटी महामंडळ अधिकारी व पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मौजे करंजखोल गावच्या हद्दीत मुंबई- गोवा मार्गावर बोरिवलीवरून येणाऱ्या महाड या शिवशाही बसला सर्विस रोड वरून येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षा चालक गणेश धोंडू कदम राहणार मोहोप्रे याने रस्त्याकडे दुर्लक्ष करीत विरुद्ध दिशेने अचानक येऊन धडक दिली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, चालक कदम हा किरकोळ जखमी झाला आहे. रिक्षा चालकाने या सर्विस रोडवरती विरुद्ध दिशेने येऊन हा अपघात झाल्याने या अपघातास रिक्षा चालक कारणीभूत असल्याने याप्रकरणी रिक्षाचालकावरती गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरालगत सर्व्हिस रोड वरती अनेक वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करत असतात. यामध्ये ज्या पद्धतीने खाजगी वाहने, त्याचप्रमाणे प्रवासी वाहने देखील विरुद्ध दिशेने प्रवास करत असतात. या त्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्यास यामध्ये प्रवाशांची मोठी जीवितहानी होऊ शकते. या प्रकरणी महामार्ग वाहतूक विभाग, पोलीस तसेच परिवहन विभागाने लक्ष घालून संबंधित सर्विस रोड हे एक दिशा मार्ग करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.







