। पालघर । प्रतिनिधी ।
वसई -विरार परिसरात खाद्य पदार्थांच्या भेसळीने कळस गाठला आहे. आधी बनावट पनीर, दही, मिठाई यांचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे वसईतील खाद्य कारखाने हे लोकांच्या जीवाशी खेळ करत खाद्य निर्मिती करत असताना अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याने राजरोसपणे खाद्य माफिया नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. नालासोपार्यात असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे, ज्या केळींसाठी वसई सुप्रसिद्ध आहे. तीच केळी आता रासायनिक पद्धतीने पिकवली जात असल्याने त्याची गुणवत्ता आणि दर्जा घसरला आहे. साधारणता या गॅसने केळी पिकण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. मात्र, जास्त प्रमाणत वापर केल्याने केवळ एक ते दोन दिवसांतच केळी तयार केली जातात. जास्त प्रमाणात इथेलीन गॅसचा वापर करून तयार केलेली केळी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. ही पिकवलेली केळी वसई विरार, नायगाव, भाईंदर आणि मुंबईतही काही ठकाणी बाजारपेठेत पाठवली जात आहेत. त्यामुळे दुकानदार अशा पद्धतीने फळ पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. यावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.