। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका रिसॉर्टमध्ये शुक्रवारी (दि. 30) दुपारच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाला. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करणारा तरुण हा अल्पवयीन मुलीचा प्रियकर असल्याचे समोर आले आहे. तर तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, बंदूक दाखवताना चुकून गोळी सुटल्याचा दावा तरुणाने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
बोईसर येथे राहणारी 17 वर्षांची मुलगी प्रियकरासोबत केळवे येथील रिसॉर्टमध्ये आली होती. दुपारीच्या सुमारास प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली. मुलीच्या मानेवर ही गोळी लागल्याने प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. माहिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, पिस्तूलची गोळी तरुणीच्या माने लगतच्या भागात अडकल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. या तरुणीची प्रकृती खालावत असल्याने तिला बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात हलविण्यात येऊन शस्त्रक्रिया केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.