बदलापूर एमआयडीसीत प्रचंड स्फोट

एका व्यक्तीचे पाय निकामी; महिला, लहान मुलगी जबर जखमी

। ठाणे । प्रतिनिधी ।

बदलापूर एमआयडीसीत औषध बनवणार्‍या एका कंपनीत सोमवारी (दि.5) पहाटे मोठा स्फोट झाला. या स्फोटात रिअ‍ॅक्टरचा लोखंडी भाग चारशे मीटर अंतरावर असलेल्या एका घरावर पडल्याने घरात झोपलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे. तसेच, या व्यक्तीची पत्नी आणि मुलगीही जबर जखमी झाली आहे. या घटनेने एमआयडीसी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

बदलापूरच्या मानकीवली एमआयडीसीमधील रारे फार्मा प्रा. लि. कंपनीत सोमवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील रिअ‍ॅक्टर जवळील रिसिव्हर टँकमध्ये स्फोट होऊन आग लागली. या स्फोटात त्याचा सुमारे शंभर किलो वजनाचा लोखंडी भाग उडून सुमारे चारशे मीटर अंतरावर असलेल्या खरवई गावातील एका चाळीतील घरावर आदळला. हा लोखंडी भाग घराच्या छताचा पत्रा फोडून घरात झोपेत असलेल्या कुटुंबातील घनश्याम मिस्त्री यांच्या पायावर पडला. त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या शेजारीच झोपलेली त्यांची पत्नी धनश्री (35) आणि मुलगी सिया (3) हे जबर जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काम करणारे काही कामगार गेटजवळ उभे होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, स्फोटाच्या हादर्‍यामुळे कंपनीचे पत्रे आणि सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय कंपनीत असलेल्या अति ज्वालाग्राही रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत आग लागून इतर साहित्यही जळून खाक झाले आहे. या स्फोट आणि आगीचे निश्‍चित कारण सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, रारे फार्मा प्रा. लि. या कंपनीत औषधी गोळ्या तयार करण्यासाठी लागणारा विव्हो बेंझोल हा पदार्थ तयार केला जातो. त्यामध्ये मिथेनोल हे पेट्रोलपेक्षा अधिक ज्वालाग्राही असलेले रसायन वापरले जाते. कंपनीत याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. तसेच, स्फोटानंतर या रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत आग लागल्याचे येथील भागवत सोनोने यांनी सांगितले. यावेळी अग्निशमन दलाने कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणली असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version