बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत श्री. बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. श्री. बल्लाळेश्‍वर मंदिर व गाभार्‍यात फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री. बल्लाळेश्‍वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते.

बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून व भारतातून पालीत हजारो पर्यटक व भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल होत असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. महाराष्ट्रभरातून पर्यटक व भाविक रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी दाखल होत आहेत. शिवाय पालीतून इतर पर्यटक देखील दक्षिण रायगड व कोकणाकडे व पुणे मुंबईकडे जात आहेत. परिणामी पर्यटक व भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत वाहतुक कोंडी होत आहे. पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, कोंडी सोडविणे अवघड होत आहे.

Exit mobile version