वानिवली येथील कारखान्यास भीषण आग

। खोपोली/रसायनी । प्रतिनिधी ।

वडगांव हद्दीतील वानिवली येथे असलेली एस.एच.केलकर या कंपनीच्या गोडाउनला मंगळवारी (दि.23) सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या कंपनीत विविध प्रकारचे सेंट (अत्तर) निर्माण होत असून या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, या आगीच्या धुराचे लोट दहा ते बारा कि.मी. पर्यंत पसरले होते.

सुरुवातीला ही आग अल्प प्रमाणात लागली असून काही वेळातच या आगीने रुद्र रूप धारण केले. यामुळे कंपनीतील व्यवस्थापकांची तारांबळ उडाली. आगीने रुद्र रूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे अवघड झाले होते. या कंपनीत जवळपास 350 कामगार काम करीत असून सर्व कामगार साडेचारला सुट्टी करुन बाहेर पडले होते. फक्त सात ते आठ कामगार कंपनीत होते तेही सुखरुप बाहेर होते. तहसिलदार आयुब तांबोळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ परिसरातील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवांनाच्या अथक परिश्रमानंतर काही तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जिवितहानी झाली नाही. शिवाय या आगीमुळे येथील परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तसेच आगीचे नक्की कारण काय, हे मात्र समजू शकले नाही. मात्र, ही आग लागताच क्षणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या परिसरात शेकडो कारखाने असून सातत्याने कोठेतरी आग लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, या पासून कामगार वर्गाचा नाहक बळी गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी आगीच्या बाबतीत प्रशासन गांभीर्य घेत नसल्याचे चित्र आहे.

Exit mobile version