गोदी, बंदर कामारांना भरघोस पगारवाढ

देशातील प्रमुख 11 बंदरातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

| चिरनेर | प्रतिनिधी |

देशातील प्रमुख 11 बंदरांतील गोदी व बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ करणारा वेतन करार शुक्रवारी (दि. 27) संपन्न झाला आहे. हा वेतन करार घडवून आणण्यामध्ये उरण तालुक्यातील भूमीपुत्र कामगार नेते भारतीय मझदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी पाच फेडरेशनचे प्रमुख नेते, पी.एम. मोहम्मद हनीफ, एस.के. शेट्ट्ये, सी.डी. नंदकुमार, नरेंद्र राव, प्रभात सामंतराय, बी. मासेन, इंडियन पोर्ट्स असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा, मॅनेजिंग डायरेक्टर विकास नरवाल, देशातील प्रमुख बंदरांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, केंद्रीय श्रम आयुक्त सुनील माळी यांच्या उपस्थितीत वेतन करारावर मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सह्या करण्यात आल्या.

या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी नेमलेल्या ड्राफ्टिंग समितीचे व्यवस्थापकीय सदस्य श्रीमती शांती मॅडम व इतर सदस्यांनी मेहनत घेतली. याप्रसंगी भारतीय पोर्ट आणि डॉक मझदूर महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत राय, खजिनदार सुधीर घरत, गोपी पटनाईक, ज्ञानेश्‍वर सोनावणे, अनिल चिर्लेकर, दिपक जाधव, जेनपीए विश्‍वस्त रवींद्र पाटील, मंगेश ठाकूर आदी उपस्थित होते. जेएनपीएसह देशातील प्रमुख 11 बंदरांतील गोदी व बंदर कामगारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ झाल्याने जेएनपीए कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version