। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतातील प्रमुख बंदरामधील बंदर व गोदी कामगारांना 1 जानेवारी 2022 पासून लागू होणारा भरघोस पगारवाढीचा वेतन करार शुक्रवारी (दि.27) मुंबईत संपन्न झाला. तत्पुर्वी इंडियन पोर्ट असोसिएशन व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये दिल्लीत समझोता वेतन करार संपन्न झाला. इंडियन पोर्ट असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक विकास नरवाल यांनी शुक्रवारी द्विपक्षीय वेतन समितीची बैठक बोलवली होती. या बैठकीला सर्व बंदरांचे अध्यक्ष व सहा फेडरेशनचे कामगार नेते यांना अंतिम वेतन करारासाठी मुंबईत निमंत्रित केले होते. दिल्लीत झालेल्या समझोता वेतन करारानुसार मुंबईत द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर बंदर व गोदी कामगारांना 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2026 असा 5 वर्षाचा भरघोस पगारवाढीचा वेतन करार संपन्न झाला.