क्रांतिभूमीत मानवी हक्क परिषद गाजली

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

आजचा शत्रू वेगळा आहे, हा खरा शत्रू सर्वांनाच संपविण्याच्या मागे आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकर, गांधी नेहरू, माक्स लेनींन, भगत सिंगना मानणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन लढले तर या शत्रूचा आपण यशस्वी मुकाबला करू शकतो. ती वेळ गेली, आज खरे मनुवादी आर एस एस, बीजेपी विरुद्ध खरा व यशस्वी लढा द्यायचा असेल तर या सर्वांनी एकजुटीने लढले तर ही ताकत कोणी ही रोखू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे यांनी मानवी हक्क परिषदेत व्यक्त केला.

महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त महाड क्रांतिभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली मानवी हक्क परिषद चांगलीच गाजली. इथं पुरोगामी परिवर्तन वादी, लढावू व क्रांतिकारी विचारांचे मंथन झाले. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे. याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला. या 1927 सालच्या ऐतिहासिक सत्याग्रह परिषदेचे प्रमुख संघटक, महाड जवळील दासगावचे शिक्षित लढाऊ तरुण रामचंद्र बाबाजी मोरे उर्फ आर. बी. मोरे हे होते. जे त्याकाळातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी व पत्रकारही होते. नंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते व पत्रकार बनले.

अशा या आर.बी. मोरे यांच्याच महाड जवळील लाडवली या जन्म गावातील बेटकर मठातील सभागृहात मानवी हक्क राष्ट्रीय परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्यातर्फे व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. पायी रॅली काढून चवदार तळ्यावर महामानवाला अभिवादन करण्यात आले. या वेळी लाल बावट्याचे वादळ व गगनभेदी घोषणांनी क्रांतिभूमी दनानून निघाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, पॉलिट ब्युरो सदस्य कॉ.एम.ए.बेबी म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून मोठी क्रांती केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकशाहीच्या मूलभूत तत्वप्रणालीवर आधारित संविधान बहाले केले. मात्र, आजही या देशातील शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार मजुराला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होत आहेत, बहुजन महापुरुषांची विचारधारा शिकवण अंगीकारून माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल झेंडा घेऊन रणांगणात उतरला आहे. येणाऱ्या 24 मार्च रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर विराट मोर्चा काढून आपल्या हक्क अधिकारासाठी मोठ आंदोलन केले जाणार आहे, या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉ.एम.ए.बेबी म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संविधान व लोकशाही पुढील आव्हाने व भारतीयांनी करावयाची कृती यावर परखड व प्रगल्भपणे विचार मांडले.

या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.एम.ए.बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य, डॉ. अशोक ढवळे,महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, कॉम्रेड आडम मास्तर, आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, लोक शाहीर संभाजी भगत, मा.क.प चे राज्य सचिव व शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, कॉम्रेड भूषण पाटील, समाजभूषण चंद्रकांत भंडारे तसेच महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आदी उपस्थित होते . यावेळी लोकशाहीर संभाजी भगत यांनीआपल्या प्रगल्भ गीतातून प्रबोधन केले.

Exit mobile version