जासई येथील बेकायदेशीर उत्खननाला गुन्हेगारीचे वळण!
। उरण । प्रतिनिधी ।
एका बाजूला निसर्गाचा संहार करत डोंगर पोखरले जात असतानाच, आता उरण तालुक्यातील जासईमध्ये चक्क मानवी अवशेष सापडल्याने उरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दादरपाडा बस स्थानकासमोरील बिअर शॉप जवळ टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात एक मानवी कवटी आढळून आली आहे. या प्रकारामुळे बेकायदेशीर माती उपशाच्या मागे एखादे मोठे गुन्हेगारी रॅकेट किंवा हत्याकांडाचे रहस्य दडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जासईतील बेकायदेशीर उत्खननाला गुन्हेगारीचे वळण लागले आहे. उरण तालुक्यात सध्या कायद्याचे नियम धाब्यावर बसवून ‘माती खोदा आणि पैसे कमवा’ हा एकच अजेंडा राबवला जात आहे. स्थानिक माती माफियांनी जासई परिसरातील डोंगरांची अशी काही चाळण केली आहे की, आता या डोंगरांना ‘खड्डा योजना’ पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. निसर्गाचे आणि शेतजमिनींचे कंबरडे मोडून सुरू असलेल्या या व्यवसायातून माणुसकी पुरती गाडली गेली आहे. निसर्गाच्या या ‘पोस्टमॉर्टम’च्या बाजारात आता चक्क माणसांची हाडे आणि कवटी बाहेर येऊ लागल्याने परिसरात कमालीची घबराट पसरली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे भर वस्तीत आणि रस्त्याच्या कडेला मानवी शरीराचा भाग सापडूनही स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासन कमालीचे शांत आहे. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, अधिकारी मात्र कोणतीही हालचाल करायला तयार नाहीत. या ढिम्म कारभारामुळे “भरावात माणसाची कवटी सापडते, पण प्रशासनाची कवटी का हलत नाही?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यंत्रणांना ‘प्रसादा’ची बाधा झाली आहे का?हा सवाल उपस्थित होत आहे.
आता ‘हप्ता पुराण’ ऐका. स्थानिक ‘शुभचिंतक’ सांगतात की जासईतून रोज 1500 डंपर माती पळवली जाते आणि प्रत्येक डंपरमागे 1000 रुपयांचा ‘प्रसाद’ वाटला जातो. म्हणजे दिवसाला 15 लाख. अहो, एवढ्या पैशात तर रोज एक छोटा ‘आयपीएल’ भरेल. एवढा ‘धंदा’ दिवसा-ढवळ्या सुरू आहे, तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आणि गोपनीय शाखा ‘कुठे नेऊन ठेवली आहे. की यांच्या डोळ्यावर 1000 रुपयांच्या नोटांचा ‘चष्मा’ आहे. माती माफिया आणि साहेब लोकांची ही ‘जोडी नं 1’ नसती तर 1500 डंपर हवेतून उडाले असते का?
उरणच्या तहसीलदार साहेबांची तर गोष्टच न्यारी. जासईत डोंगर फोडले जातात, शेतजमिनींचा ‘कीमा’ केला जातो, पर्यावरणाची ‘आई-माई’ एक केली जाते, आणि आता तर भरावात कवटी सापडते, तरी संबंधित अधिकाऱ्यांचे मौन का? साहेब, डंपरच्या कलेक्शनवर नजर असते, मग कवटीवर नजर का जात नाही?
त्यामुळे कवटीचा ‘आधार कार्ड’ शोधा आणि ती कोणाची आहे याचा तपास करावा अशी जनतेतून मागणी होत आहे. जास्त येतील माती माफियांवर एमपीडीए लावून ‘धन्वंतरी’ टोळीचा ‘गॉडफादर’ कोण, हे शोधायला एसआयटी नेमा. आणि हो, ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे, त्या पोलीस आणि महसूलच्या ‘महानुभावांवर’ पण कारवाई करा. नाहीतर उद्या या भरावात आणखी कवट्या सापडतील.
