| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावरील पाण्याच्या हौदामध्ये मानवी हाडांचा सापळा सापडल्याने उरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ऐतिहासिक द्रोणागिरी गडावरील पुरातन हौद उन्हामुळे सुकून गेला आहे.शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या गडसंवर्धन कार्यक्रमाअंतर्गत आज सकाळी हौदातील गाळ साफ करण्याचं काम सुरू असताना हा सापळा सापडला आहे. या घटनेची त्वरित माहिती उरण पोलिसांना देण्यात आली. याबाबत उरण पोलिसात तक्रार दाखल झाली असून, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकार्यांनी घटना स्थळी पाहणी करून सापळा ताब्यात घेतला आहे.
सदर सापळ्याची कवटी व काही हाडे सापडली आहेत. त्यामुळे ही घटना जुनी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर सापडलेला सापळा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असून त्यानंतरच याचा शोध लागण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ऐतिहासिक द्रोणागिर गडावर नेहमीच वर्दळ असतानाही हौदामध्ये मानवी सापळा सापडल्याने जनतेत खळबळ माजत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.