मनोरूग्णला पोलीसाची माणुसकी

सोशल मिडियावरुन भलताच प्रसार
| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील देवपूरवाडी ते खडपी या ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळी विक्षिप्त हालचालींमुळे तरूणांनी हटकल्यानंतर पाकिस्तान लाहोर असे बडबडल्याचा उल्लेख सोशल मिडीयावरून ज्या अज्ञात व्यक्तीबाबत झाला. तो तेथून जंगलात निसटल्यानंतर रात्रभर त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणचे ग्रामस्थ शोध घेत होते. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास तो इसम पोलादपूर पोलीसांना कुडपण रस्त्यालगत विमनस्क अवस्थेत आढळून आला. पोलादपूर पोलीसांनी त्या इसमाला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्टच्या ताब्यात दिल्याची माहिती प्राप्त झाली.

शनिवारी सायंकाळी अज्ञात इसमाच्या संशयास्पद हालचालींमुळे काही तरूणांनी त्याला हटकले आणि कुठला राहणारा असे विचारले असता त्या इसमाने पाकिस्तान लाहोर अशी तुटक तुटक उत्तरे दिली आणि तो भितीने जंगल उताराच्या दिशेने पळून गेल्याचे मेसेज सोशल मिडीयावरून फिरू लागले. मोरगिरी, खडपी, गांजवणे, देवपूर, कोंढवी, चोळई आणि धामणदिवी या पट्टयामधील ग्रामस्थांनी सतर्क राहून सदर विक्षिप्त इसमाबाबत पाळत ठेवून ताब्यात घ्यावे, शक्यतो तो इसम मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर येऊ शकेल, असे मेसेज सोशल मिडीयावरून शनिवारी सायंकाळी मोठया संख्येने व्हायरल होऊ लागले. यामुळे ग्रामीण भागात सतर्कता व घबराट देखील पसरली होती.

पोलादपूर पोलीसांनी शनिवारी रात्री संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान देवपुरवाडी व खडपी येथील जंगल भागात पळून गेलेला इसम रविवारी सकाळी साडेसहा वाजता तब्बल बारा तासांनंतर पोलादपूर कुडपण रस्त्यालगत भेटला. त्याला पोलादपूर पोलीसांनी पोलीस स्टेशनला आणल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याला नाव गाव पत्ता विचारले असता त्याला काहीच सांगता येत नसल्याने तो मानसिक रुग्ण असल्याची खात्री पटली. पोलादपूर पोलीसांनी यावेळी त्याची मानवतेच्या दृष्टीकोनातून सुषृशा केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या मनोरूग्ण व्यक्तीची रवानगी यशोधन ट्रस्टमध्ये केली आहे.

दरम्यान, ग्रामस्थ व तरूणांनी अशा व्यक्तींना कोणतीही इजा अथवा दुखापत न करता सुरक्षितपणे पोलीसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर आणि गुप्तवार्ता विभागाचे कॉन्स्टेबल इकबाल शेख यांनी केले आहे.

Exit mobile version