दिव्यांगांचे करणार शंभर टक्के मतदान; साईनाथ पवार यांचा संकल्प

| रायगड । प्रतिनिधी ।

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांचे शंभर टक्के मतदान होण्यासाठी दिव्यांग मतदार आयकॉन तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांनी संकल्प केला आहे. जिल्हाधिकरी कार्यालयात जिल्हाधिकरी किशन जावळे यांची साईनाथ पवार यांनी भेट घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना रायगड जिल्हा सचिव संतोष माने उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघात येत्या (दि.7) मे रोजी मतदान होत असून दिव्यांग मतदान मोठ्या प्रमाणात होण्यासाठी दिव्यांग मतदारांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने साईनाथ पवार यांना दिव्यांग मतदार आयकॉन म्हणून घोषित केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांग मतदारांना सहजपणे मतदान करता यावे, या दृष्टीने विविध सुविधा पुरविण्याचे प्रविण्यात येत आहेत. यासाठी सक्षम या मोबाईल अ‍ॅपद्वारे ते मागणी देखील करू शकतात. मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहन सुविधा, रॅम्प, व्हीलचेअर, मदतनीस, ब्रेलमधील मतपत्रिका याद्वारे त्यांची मतदान प्रक्रिया सुकर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती साईनाथ पवार पोहोचवत आहेत.

लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर (दि.15) मार्च पासून दिव्यांग मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकार्‍याचे प्रतिनिधी या नात्याने या कालावधीत दिव्यांग मतदार आयकॉन साईनाथ पवार यांनी मतदारसंघात सर्व तालुक्यातील दिव्यांग मतदार मेळावे घेण्याचे नियोजन केले आहे. (दि.15) मार्च ते आत्ता पर्यंत 9 तालुक्यात भेट दिली आहे. अलिबाग पासून सुरुवात करून प्रत्येक आठवड्यात 2 ते 3 तालुक्यात जाऊन शाळा, पंचायत समिती सभागृह आदी 4 ते 5 अशा विविध ठिकाणी भेटी देत मेळावे घेतले आहेत.

Exit mobile version