वादळाच्या तडाख्याने शेकडो बोटी आश्रयाला

। मुरूड । वार्ताहर ।
ऐन मासेमारीच्या हंगामात अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर वादळी वारे वाहत असल्याने मासेमारीचे तीनतेरा वाजले आहेत. वादळी वातावरणामुळे खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली असून मासेमारीस गेलेल्या नौका आश्रयासाठी मिळेल त्या किनार्‍यावर जाण्यासाठी आटापिटा करीत असल्याची माहिती मुरूड-जंजिरा तालुका मच्छीमार तालुका कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी बुधवारी (दि.14) दिली.

वादळात रायगडातील आगरदांडा- दिघी खाडी बंदर सर्वाधिक सुरक्षित समजले जाते. त्यामुळे शेकडो नौका या बंदराकडे आलेल्या आहेत. डहाणू, सातपाटी, पालघर, करंजा, उरण, मुंबई, गुजरात येथील शेकडो मोठ्या नौकांनी या प्रशस्त खाडीपात्रात नौका नांगरल्या आहेत. बुधवारी देखील सकाळपासून नौकांचे इन्कमिंग सुरूच होते. सर्वत्र कोकणात समुद्रकिनारी आसरा मिळेल तिथे नौका घुसत आहेत. यावरूनच वादळाची तीव्रता मोठी आहे, असे दिसून आले आहे.

आगरदांडा- दिघी बंदर खाडी नौकांनी भरून गेली आहे. तरीदेखील खोल समुद्रात या पूर्वी गेलेल्या नौका येतच आहेत. समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी सांगितले की, उसळत्या लाटांचा प्रवाह किनार्‍याकडे असतो. त्याला पकडून त्या प्रवाहाबरोबर नौका किनारा गाठत असतात. लाटांच्या विरुद्ध दिशेने गेल्यास नौका उलटून बुडण्याचा मोठा धोका असतो. सिंधुदुर्ग जिह्यात देखील देवगड समुद्र खाडीत गुजरात, मुंबई च्या शेकडो नौका आश्रयाला आल्या आहेत. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मासेमारी तीन-तेरा वाजल्याचे चित्र आहे.

माशांची आवक घटली
मासळी बाजारात बुधवारी फेरफटका मारला असता कुठेच मोठी किंवा छोटी मासळी दिसून आली नाही. दोन दिवसांच्या उपवासानंतर मार्केटमध्ये मासळी येईल हा खवय्यांचा अंदाज सपशेल फोल ठरला. खाडीतील मासळी देखील दुरापास्त झाली आहे. उपलब्ध कोलंबी, मांदेली या छोटी मासळीची अवस्था पाहवत नाही अशी दिसून आली.

Exit mobile version