वादळामुळे शेकडो मच्छिमारी बोटी मुरुड किनारी

 रत्नागिरी,करंजा ,गुजरात नौकांचा समावेश; खोल समुद्रातील मासेमारी ठप्प
 मुरूड | प्रकाश सद्रे |
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातही वादळ निर्माण होऊ लागली आहे.याचा मोठा फटका मच्छिमारी बोटींना बसला असून,आगरादांडा,दिघी परिसरात रत्नागिरी,करंजा,गुजरातच्या शेकडो बोटी सुरक्षिततेसाठी दाखल झालेल्या आहेत.
मुरूड शहर अरबी समुद्राच्या अगदी समोर आहे. या उलट आगरदंडा-दिघी बंदर हा खाडी पट्टा असून यांच्या सभोवतालचा परिसर डोंगराने वेढलेला आहे. त्या मुळे वादळाची तीव्रता कमी होते. सप्टेंबर महिन्याच्या दोन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बदल्यामुळे कधी जोरदार वार्‍यांचा मारा तर कधी मुसळधार पावसामुळे समुद्रकिनारी राहणार्‍या लोकांचे जीवन अधिक धोकादायक बनले. संपूर्ण कोकणात मासेमारी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणार्‍या कोळी समाजावर मोठे संकट कोसळून त्यांची परिस्थिती  अधिक दोलायमान बनली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत अरबी समुद्रात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून सुरक्षितता म्हणून रत्नागिरी, उरण, करंजा, राजपुरी मुरूड आणि गुजरात येथून येथील सुमारे 100 नौका शुक्रवार पासून  मासेमारी सोडून दिघी- आगरदंडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत.
 वादळाच्या शक्यते मुळे राजपुरी येथील नौका आगरदंडा – दिघी बंदरात नेण्यात आल्याची माहिती राजपुरी येथील जेष्ठ मच्छिमार धनंजय गिदी, यांनी दिली.

 यंदाच्या सीझनमध्ये खोल समुद्रातील मासेमारी सुरु झाली होती.परंतु लहरी वादळी हवामानामुळे  सातत्याने व्यत्यय येत राहिला.आता पुन्हा एकदा वादळाचा इशारा असल्यानें बाहेर गावच्या सुमारे 100 नौका दिघी- आगरदंडा बंदरात दाखल झालेल्या आहेत.
 धनंजय गिदी, मच्छिमार
 
वादळी काळात दिघी- आगरदंडा बंदर नौकांसाठी परिसरात सुरक्षित समजले जाते.आगरदांडा व दिघी बंदरात सर्वाधिक बोटी नांगरून ठेवल्यामुळे जिकडे पहावे तिकडे बोटीचं बोटी दिसत आहेत.  खराब हवामानामुळे बाहेर राज्यातील बोटींना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.कारण मुख्य बाजारपेठ गाठण्यासाठी ऑटो रिक्षा मोठे अथवा टेम्पो मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातील माणसांवर खर्च वाढला आहे. यासाठी हवामान लवकर सुरळीत होऊन आम्हाला आमच्या राज्यात सुखरूप जाऊदे अशी पार्थना करताना येथील बोट मालक दिसत आहेत.

Exit mobile version