महास्वच्छता अभियानाला शेकडो हात

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा उपक्रम 2024’ राबवण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सहभागी स्वच्छता दूतांनी मुरुड समुद्रकिनारा परिसराची स्वच्छता केली. या महास्वच्छता अभियानाला नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा देखील उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्वच्छता ही राष्ट्र सेवा आहे. शहरातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रत्येकांनी प्रयत्न केले पाहिजे. घरातील कचरा उघड्यावर व गटारात न टाकता नगरपरिषदेच्या कचरा गाडीमध्ये टाकावा. यामुळे कुठलीच रोगराई पसरणार नाही आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसेल. आपला परिसर पर्यटनस्थळ असुन शेकडो पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात. स्वच्छता पाहुन पर्यटकांची संख्येत वाढ होऊन रोजगार वाढेल. तरी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता स्वच्छता अमलांत आणा, असे आवाहन नगरपरिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक नदंकुमार आबंतेकर यांनी केले आहे.

यावेळी नगरपरिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक नदंकुमार आबंतेकर, आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, सतेज निमकर, प्रशांत दिवेकर, कपिल वेहले, सचिन कोरके, अनिकेत भोसले, नयन शिंदे, जयेश चोडणेकर, अविनाश अवघडे, राकेश शिंदे, मितेश माळी, प्राध्यापक, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version