कंपनीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पिकांवर परिणाम
| अलिबाग | प्रतिनिधी |
रिलायन्स कंपनीच्या धुरामुळे मानवी आरोग्याबरोबरच भात, कडधान्य, आंबा व अन्य पिकांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याशी कंपनी खेळत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. रिलायन्स कंपनीच्या धुरामुळे पिकती शेतजमीन संकटात आली आहे. झोतीरपाडापासून वरवठणेपर्यंतच्या परिसरातील सुमारे 500 हेक्टर क्षेत्र धुरामुळे बाधित होऊन पिकत्या जमिनी नापिक होण्याची शक्यता प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
रोहा तालुक्यातील नागोठणे, आंबेघर, वेलशेत, करसुरे, कुहिरे, बेणसे, झोतीरपाडा, वरवठणे, शिहू या गावांतील एक हजार दोनशेहून अधिक शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करून दोन हजार 200 हेक्टर क्षेत्रामध्ये आयपीसीएल प्रकल्प उभारण्यात आला. त्यानंतर या जागेत रिलायन्स प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या कंपनीतील सांडपाणी जवळच असलेल्या आंबा नदीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे मासे मृत्युमुखी होण्याचे प्रमाण वाढले असून, पाण्याला दुर्गंधी पसरत आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होऊ लागला आहे. ताप, थंडीबरोबरच इतर आजारही निर्माण झाले आहेत. त्यामुळे रिलायन्स कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांनी केला आहे.
रिलायन्स कंपनीमार्फत निघणाऱ्या धुराचा परिणाम आजूबाजूच्या गावांतील भात व अन्य पिकांवर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. वाल, पावटा व अन्य कडधान्य पिकांसह आंबा पीक काळे पडू लागले आहे. मोहरावरही त्याचा परिणाम झाल्याने आंबा उत्पादक शेतकरीदेखील मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. झोतीरपाडापासून वरवठणेपर्यंतच्या सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्रापर्यंत भात, कडधान्य व अन्य पीक बाधित होण्याची भीती निर्माण झाल्याने हे पीक भविष्यात नापिक होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली जात आहे. परंतु, त्यावर ठोस कारवाई केली जात नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
रिलायन्स कंपनीतील सांडपाणी आंबा नदीत सोडल्याने येथील गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. कंपनीच्या धुरामुळे झोतीरपाडा, बेणसे, शिहू या परिसरातील भात व अन्य पीक करपून जात आहेत. या धुराचा फटका कुहेरे गावाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. इथेनेल तेलाच्या वासामुळे आरोग्याबरोबरच पीकदेखील संकटात आले आहे. सुमारे 500 हेक्टर क्षेत्र बाधित होऊ लागले आहे.
सुरेश कोकाटे, प्रकल्पग्रस्त
प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा एक हजार 287 प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यात आले. 50 जणांचे प्रमाणपत्र गहाळ झाले. सुरुवातीला 690 प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये घेतले. उर्वरित प्रकल्पग्रस्त आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे.20 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत 324 प्राधान्य प्रमाणपत्रधारकांना कंपनीत कायम नोकरी देण्याचे ठरले. आठ दिवसांत पत्र देण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले. याला आज महिना होत आला आहे, परंतु त्याची कार्यवाही अद्याप झाली नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांनी केला आहे.
रिलायन्स कंपनीमार्फत सांडपाणी नदीमध्ये सोडले जात आहे. दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे अनेक आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. रिलायन्स कंपनी आजूबाजूच्या गावांतील नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत.
पंडित पाटील,
माजी आमदार
प्रक्रिया केलेले पाणी शहापूर-धेरंडजवळील खोलवर समुद्रात सोडले जाते. आंबा नदीत सोडले जात नाही. त्यामुळे मासे मृत्युमुखी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. कंपनीतील चिमणी उंच आहे. त्यामुळे धुरामुळे आरोग्याबरोबरच पिकांची हानी होण्याचे कारण नाही. कंपनीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमित चाचण्या होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर रिलायन्स कंपनीच्या प्रशासनातील अधिकाऱ्याने दिली.