ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याबरोबरच निलंबन करण्याची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
पेणमधील कृष्णा सोनावणे या व्यक्तीला पेण पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळी करून मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक फौजदाराविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कृष्णा सोनावणेसह स्वराज्य संविधान रक्षक (पँथर आर्मी) चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशील जाधव यांनी उपोषण सुरु केले आहे. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि. 4) पासून उपोषण करण्यात आले आहे.
सोनावणे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते खासगी सुरक्षा रक्षक आहेत. 12 मे 2025 रोजी पनवेलकडे जाण्यासाठी पेणमधून एसटीत चढत होते. त्यावेळी एका प्रवाशाने धक्का लागल्याचा आरोप करीत शिवीगाळी केली. अखेर हा वाद वाढल्याने पोलीस ठाण्यात चालत निघाले. त्यावेळी रस्त्यातच त्या व्यक्तीने सोनावणे यांना मारहाण केली. अखेर सोनावणे पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी सहाय्यक फौजदार ढोबळे यांनी खांद्याला पकडून जबरदस्तीने आतील खोलीत नेले. त्याठिकाणी हाताबुक्क्याने मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळी देखील केली. ज्या व्यक्तींनी रस्त्यात मारहाण केली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ढोबळे यांनी केलेल्या मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली. रक्षकच भक्षक बनल्याने पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्याकडे तक्रार केली. परंतु, त्यांनीदेखील योग्य न्याय दिला नाही. असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना निलंबीत करावे, या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे.
हा आहे, उपोषणकर्त्यांचा आरोप
रविंद्र ढोबळे यांच्याविरोधात ॲट्रोसिटी गुन्हा नोंदवावा. त्यांना निलंबित करावे. पेण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांनासह आरोपी करून गुन्हा दाखल करावा. चुकीच्या पध्दतीने तपास करून फसवणूक केली आहे. पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ॲट्रोसिटी अंतर्गतचा अर्ज निकाली काढण्यासाठी अडीच महिने लावले. चुकीच्या पध्दतीने रिपोर्ट तयार करून पोलीस अधीक्षक यांची दिशाभूल केली आहे.
जातीवाचक शिवीगाळी केली नाही. ज्यांनी सोनावणे यांना मारहाण केली होती. सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांच्याविरोधात कारवाई केली.
रविंद्र ढोबळे
सहाय्यक फौजदार







