। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील नडोदे गावचे शेतकरी नरेंद्र साळवी व दिगंबर पवार यांच्या शेतजमिनींमधून टाटा पॉवर कंपनीच्या 5 उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांची सुपीक जमीन नापीक झाली असून, त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. या अन्यायाविरोधात शेतकरी नरेंद्र साळवी आणि दिगंबर पवार यांनी खालापूर तहसीलदार अभय कुमार चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणी आम्हाला जर प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही, तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नडोदे मधील पिडीत शेतकर्यांच्या मते, त्यांच्या जमिनीतून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. शेतात पीक उगवत नाही त्यामुळे उत्पन्न नाही. असे असतानाही सरकार शांत बसले आहे. त्यामुळे पीडीत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात टाटा पॉवरकडे वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीने कोणतीही भरपाई दिलेली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने यात हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या शेतकर्यांनी केली आहे. तसेच आम्हाला जर न्याय मिळाला नाही, तर आम्ही खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा देखील या पिडीत शेतकर्यांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.