। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील अलोरे शीरगाव सीमेवर गुरांच्या गोठ्यात घुसून, एका बिबट्याने वासराची शिकार केली आहे. याप्रकरणी वनविभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. पंचनाम्याअंती संबंधित शेतकर्याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वनविभाग कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातील अलोरे पोफळी शिरगाव या परिसरात बिबट्याचा वावर हा नेहमीचाच विषय राहिला आहे. घनदाट जंगल असल्याने बिबट्याचा वावर येथे असतो. परंतु बिबटे आता मानवी वस्तीकडे चाल करू लागले असल्याचे अनेक उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.
दोन महिन्यापूर्वीच तालुक्यातील पिळवली येथे बिबट्याने पती पत्नीवर हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.