गुलाब चक्रीवादळाचा भातशेतीला फटका

डोळ्यादेखत उभी पिके झाली अडवी
शेतातील पाण्यामुळे पिके झाली मातीमोल
पाताळगंग | वार्ताहर |
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुलाब चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे त्यातच भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होत असताना त्याच्या वजनाने भातशेती पडत असून, मोठे नुकसान होत आहे. शिवाय, शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्यामुळे त्यातच भातशेती पडल्यामुळे भात शेती कुजली जात आहे. त्याचबरोबर भाताच्या लोंब्यांपासून दाणा अलग होत असून, कुजण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
मातीत टाकलेला पैसा डोळ्यादेखत वाया जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या काही वर्षात शेती करण्यास शेतकरी वर्ग पाठ फिरवत आहे. त्याचबरोबर मजूर खर्च, नांगरणी, लागवड ते कापणीपर्यंत मोठा खर्च होत आहे. मात्र, त्याची पर्वा न करता काही शेतकरी शेती करीत आहे. त्याचबरोबर शेतीची विभागणी झाल्यामुळे शेतीचे तुकड्यात रुपांतर झाले आहे.
मात्र, असे असूनही अल्प भूधारक शेतकरी शेती करीत आहे. मात्र, लागवड झाल्यानंतर ते भातकापणी होईपर्यंत शेतकर्‍यांपुढे मोठे आव्हान असते. मात्र, भाताच्या लोंब्यांमध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असताना दरवर्षी भातशेती पडत असते. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने भातपीक कुजले जाऊन गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न मोठा गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसान भरपाई मिळावी.
मंगेश पाटील, शेतकरी, माजगाव-आंबिवली

Exit mobile version