। नागपूर । वृत्तसंस्था ।
मुलीला विष पाजून पती-पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरमध्ये घडली आहे. यात मुलीची प्रकृती चिंताजनक आहे मात्र, यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रिजू नायर याची पत्नी प्रिया हिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. प्रियाच्या उपचारासाठी सर्व कुटुंबीय नागपुरात आले. प्रिया यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कॅन्सर असल्याने तिच्यावर महागडे उपचार सुरू होते. आजारपणामुळे होत असलेल्या जास्त खर्चामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. त्यातच बुधवारी प्रियाची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरने तिला औषधे घेण्यास सांगितले. मात्र तिला हवे असलेले इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे तिचा नाकात नाणी तोंडातून रक्त आले आणि तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारावर जास्त खर्च होत असल्याने चिंताग्रस्त होऊन घरी परत आल्यानंतर दोन्ही पती-पत्नीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी रात्री जेवल्यानंतर प्रियाने तिची मुलगी वैष्णवी हिला विष मिसळले कोल्ड्रिंक दिले. नंतर त्या दोघांनीही कोल्ड्रिंकमध्ये मिसळलेले विष प्यायल्याने या जोडप्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मुलगीने आपल्या आई वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्या मुलीने शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वैष्णवीला उपचारासाठी एमईओ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जरीपटका पोलीस अधिक तपास करत आहेत.