। सोलापूर । प्रतिनिधी ।
विहिरीत पडून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. कपडे धूत असताना पाय घसरून पत्नी विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी पतीने विहिरीत उडी घेतली. मात्र, विहिरीत पाणी भरपूर असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे हि दुर्दैवी घटना घडली. सोमवारी (दि. 14) सावित्री संगप्पा कोळी (31) ह्या शेतावरील विहिरीवर कपडे धुवायला गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे पती संगप्पा चंदप्पा कोळी (38) यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, विहिरीत पाणी भरपूर होते. त्यातच घाबरलेल्या सावित्रीने पती संगप्पाच्या गळ्याला घट्ट मिट्टी मारली. त्यामुळे संगप्पा यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जवळच असणार्या संगप्पाच्या आईला आवाज येताच सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत पती-पत्नी दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.