| नवी मुंबई | प्रतिनिधी |
भाजपच्या पदाधिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेसह तिच्या मुलाला लाकडी दांडक्याने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.12) सायंकाळी खारघर सेक्टर-21 मध्ये घडली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर स्थानिकांनी खारघर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपी रमेश खडकर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार किरण गिते (36) याचा खारघर सेक्टर-12 मध्ये भाजीपाला व फळविक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि.12) सायंकाळी किरण हा आई सिंधुबाई व बहिणीसह टेम्पोतून फुलाची विक्री करत असताना आरोपी भाजप पदाधिकारी रमेश खडकर याच्यासोबत वादा झाले. त्या वेळी खडकर याने किरणला शिवीगाळ करून त्याच्या कानाखाली मारली. या वेळी सिंधुबाई यांनी या मारहाणीबाबत रमेशला जाब विचारला असता. त्यांना ही धक्का देत घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर किरण व सिंधुबाई या खारघर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, शिवाजी चौकात आरोपी रमेश खरकर याने आपल्या 10 ते 15 कार्यकर्त्यांसह किरण व सिंधुबाई यांना थांबवत लाकडी दांडक्याने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सिंधुबाई व किरण याने त्याच अवस्थेत खारघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.