| खोपोली | प्रतिनिधी |
अज्ञान कारणावरून पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून खून केल्याची घटना खोपोली शहरातील लौजी परिसरात घडली आहे. शितल गणेश घोडके (28) असे मृत पत्नीचे नाव आहे. गणेश दादासाहेब घोडके (32) हा घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेमुळे खोपोलीत खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री घडली. मोठ्या शिताफीने खोपोली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत पतीला साताऱ्यातून ताब्यात घेतले आहे.
खोपोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीत उदय विहार भागात सुखकर्ता आपर्टामेंट मध्ये गणेश घोडके व त्याची पत्नी शीतल घोडके हे मागील तीन चार महिन्यांपासून राहत होते. लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यांना मुलबाळ नव्हते. दोघे पती पत्नी एकमेकांवर चारित्र्यावरून संशय घेत होते. व त्यांचे कायम भांडण होत. बुधवारी रात्री त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. गणेशने पत्नी शीतल हिचे डोके दोन तीन वेळा भिंतीवर आपटले. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यात तिचा जीव गेला. पत्नीची हालचाल होत नाही, हे पाहून त्याने त्याच्या मित्राला आशुतोष देशमुख यांस फोन करून बोलावले व घडलेला प्रकार सांगितला. आशुतोषने गणेशला पोलिसांत जाण्याबाबत सांगितले. पण गणेश काही तयार झाला नाही. तेव्हा आशुतोष खोपोली पोलीस ठाण्यात आला. दरम्यान, गणेशने पत्नीचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला व तो आपली कार घेऊन पसार झाला. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना शीतलचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला. पण गणेश मिळून आला नाही. गणेश आपली कार घेऊन साताऱ्याच्या दिशेने जात असल्याचे समजताच सातारा टोल नाक्यावर त्याला जेरबंद करून ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासांच्या आत त्याला खोपोलीला आणले. त्यानंतर गणेश घोडके यांने खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास खोपोली पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.