| पनवेल | वार्ताहर |
पाच कोटी रूपयांच्या सुपारी आणि मिरी चोरीतील तिसर्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. रामदास कुरंगळे असे आरोपीचे नाव आहे. शिरढोण येथील गाळ्यात कस्टम विभागाकडून कस्टम ड्युटी न भरलेला तीन कंपन्यांचा सुपारी व मिरी हा माल चोरून नेण्यात आला होता. या चोरी प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कुणाल रमेश भानुशाली याला भिवंडी येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुसरा आरोपी सागर बांगर याला देखील पोलिसांनी अटक केली. त्याचा या चोरीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गाळ्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा रामदास कुरंगळे याचा सुद्धा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पुढील तपासाकरिता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील, केदार करीत आहेत.