| पनवेल | वार्ताहर |
उलवे, सेक्टर-24 मध्ये राहणार्या राज पोकळे (28) या विवाहित तरुणाने पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानुसार उलवे पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी अक्षता चौलकर (28) हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पती जिवंत असताना, दुसरे लग्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत राज पोकळे आणि त्याची पत्नी अक्षता दोघेही उलवे, सेक्टर-24 मधील महाविर साई सुरत बिल्डींग मध्ये राहत होते. या कालावधीत अक्षताने दुसर्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरु होते. त्यामुळे तिने पती राज याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच अक्षताने पती राज जिवंत असताना त्याच्याशी घटस्फोट न घेता, तिचे प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीसोबत विवाह करण्यासाठी रजिस्टर कार्यालयात नोंदणी केली होती. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या राज पोकळे याने 24 जानेवारी रोजी दुपारी उलवे येथील घरामध्ये आत्महत्या केली होती. उलवे पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यादरम्यान राज पोकळे याने पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार उलवे पोलिसांनी मृत राज पोकळे याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन अक्षता चौलकर हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.