| पनवेल | वार्ताहर |
कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे (नॉईज बॅरियर) चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. एजाज अहमद मोमीन आलम शेख (26) कोन, मूळ-उत्तरप्रदेश, रोजअली मुसताक खान (22) पळस्पे, रईस सलारु खान (37) पळस्पे या तिघांना कोनगांव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
माकड आणि इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून या प्राण्यांच्या संरक्षणासाठी कर्नाळा अभयारण्य परिसरात उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आहेत. कर्नाळा अभयारण्य येथे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे (बॉक्स) चोरुन ते पळवून नेताना टेम्पो जागरुक वाहन चालकांनी पकडला. यावेळी चोर जंगलातील दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरुन उडी मारुन जंगलात पळून गेले होते. या प्रकाराची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो ताब्यात घेतला. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तीनही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी भंगार वेचणारे आणि भंगार विक्रेते असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.