हैदराबादची मुंबई इंडियन्सवर मात

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबई इंडियन्स बुधवारी सपशेल अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना आयपीएलमधील एका डावातील सर्वाधिक 277 धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करताना मुंबईने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना पाच बाद 246 धावांपर्यंत मजल मारता आली. अखेर 31 धावांनी पराभव झाला. दोन्ही डावांत मिळून विक्रमी 523 धावसंख्या उभारण्यात आली. या लढतीत सर्वाधिक 38 षटकार मारले गेले. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. हैदराबादने पहिल्या विजयाला गवसणी घातली.

हैदराबादकडून मुंबईसमोर 278 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. रोहित शर्मा व इशान किशन या जोडीने 56 धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात केली; पण दहा धावांच्या अंतरात दोघेही बाद झाल्यामुळे मुंबईचा पाय खोलात गेला. शाहबाद अहमद याने इशानला 34 धावांवर, तर पॅट कमिन्सने रोहितला 26 धावांवर बाद केले.

Exit mobile version