मी चिटर आमदार; आ. महेंद्र दळवींची कबुली

अनिकेत तटकरेंचा गौप्यस्फोट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महायुतीच्या एका बैठकीत आ. दळवींनीच सांगितले होते की, ‌मी चिटर आमदार आहे, मला कोणी काही करू शकत नाही. महाराष्ट्रात सर्वात चिटर आमदार असेल तर तो मीच आहे,‌ असा गौप्यस्फोट अनिकेत तटकरेंनी केला आहे.

रायगड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अलीकडेच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, आम्ही मतभेद बाजूला ठेवून तटकरे यांना दिल्लीला पाठवले, पण त्यांनी आम्हाला फसवले.  या वक्तव्यानंतर महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा पेटला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जहरी पलटवार करत, त्यांना ‘डोक्यावर पडलेले आमदार’ असे संबोधले आहे.

अनिकेत तटकरे म्हणाले की, ते डोक्यावर पडलेत एवढंच मला सांगायचं आहे, बाकी काहीच त्याच्यात वाच्यता करायची नाही. त्यांनी दळवींना लक्ष्य करत पुढे म्हटले की, स्वतःला ‌‘चिटर आमदार‌’ म्हणणारे, ते दुसऱ्यांकडेही त्याच नजरेने पाहतात. या तीव्र शब्दयुद्धामुळे रायगड जिल्ह्यातील महायुतीतील मतभेद अधिकच उफाळून आले असून, येत्या स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे चर्चेला उधाण आले असून, महायुतीतील अंतर्गत कलहामुळे प्रचारात कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version