| अलिबाग | प्रतिनिधी |
माझ्याविरोधात कितीही राजकीय चक्रव्यूह रचले, कितीही कटकारस्थाने केली तरी त्यातून बाहेर पडण्याची ताकद माझ्यात आहे. महाभारतात अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता; मात्र मी चक्रव्यूह भेदून बाहेर पडणारा योद्धा आहे. महायुतीच्या आमदारांविरोधात काम केल्याचा एक तरी ठोस पुरावा द्या. विरोधकांची टीका मी एन्जॉय करतो; मात्र रायगडच्या विकासाचा ध्यास कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिला.
अलिबाग येथे सोमवारी (दि. 16) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे गटाच्या आमदारांकडून आणि पालकमंत्र्यांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना तटकरे यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ दिला. 2002 मधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीतील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत सहकार्य केले असून, महायुतीच्या आमदारांविरोधात काम केल्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेलाही तटकरे यांनी पूर्णविराम दिला. सुप्रिया सुळे यांनी या विषयावर भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमच्याकडूनही विलीनीकरणाचा विषय संपला असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर आपण त्यांचे अभिनंदन करून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची भूमिका मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून रायगडच्या विकासाला गती मिळाली पाहिजे. विकासाच्या कामात आपण अपयशी ठरलो तर काळही आपल्याला माफ करणार नाही, असे तटकरे म्हणाले.
अलिबागमधील सुमारे 700 कोटींच्या मेडिकल कॉलेज प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी प्रकल्पाला होणारा विलंब आणि भूसंपादनाचा प्रश्न मांडला. शेतकऱ्यांना 2013 च्या कायद्यानुसार योग्य मोबदला मिळावा, यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टोरंटचा कर्जत ऊर्जा प्रकल्प, टाटाचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प आणि माणगावमधील पंप स्टोरेज प्रकल्पांबाबत बोलताना पर्यावरणीय परिणाम, वृक्षतोड आणि ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करूनच पुढील निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अलिबाग-रोहा मार्गावरील दुरवस्था आणि पुलांच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येवरही त्यांनी भाष्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांबाबत आदेश दिल्यानंतरही वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्याबद्दल आपल्याला कायम आदर राहील, असे सांगत तटकरे यांनी बारामती दौऱ्याचा संदर्भ दिला. अपघातस्थळी अभिवादन करून अजित पवार यांच्या मातोश्री आणि भगिनींची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार पाहिले असून, टीका करताना भाषेचा आणि वैचारिक स्तराचा तोल आपण कधीही ढळू दिला नाही. विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे; मात्र आपण रायगडच्या विकासासाठी काम करत राहणार आहोत, असेही तटकरे यांनी ठामपणे सांगितले. यावेळी हर्षल पाटील, चारहास मगर, जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक आणि तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत उपस्थित होते.






