मी शेकापक्षाचीच- चेंढरे उपसरपंच प्रणिता म्हात्रे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रणिता प्रल्हाद म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे वैयक्तिक भेटीचे फोटो व्हायरल करुन आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणार्‍या शिवसेनेच्या नतद्रष्टांना टोला लगावत आपण शेतकरी कामगार पक्षाच्याच असून शेकापक्षामुळेच आपल्याला उपसरपंचपद मिळाले असल्याची चपराक शिवसेनेला लगावली आहे.


चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रणिता प्रल्हाद म्हात्रे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार त्यांनी म्हटले आहे की, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन व्हॉटस्अप आणि फेसबूक सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या संदर्भातले चुकीचे फोटो व्हायरल करुन जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण करण्यात येऊन चेंढरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद हे शिवसेनेचे असल्याचे भासवण्यात आले. परंतू मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की, मागील दोन वेळा मी चेंढरे ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून निवडून आले ते केवळ शेकापक्षाची उमेदवार असल्यामुळेच.
शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या आशिर्वादामुळे आणि चेंढरे विभागातील शेकाप नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, अ‍ॅड परेश देशमुख, प्रशांत फुलगावकर, यतीन घरत यांच्याच सहकार्याने आज मला चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बसण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात देखील मी शेकापक्षाची उपसरपंच आणि कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यामुळे विरोधकांनी जो मी शिवसेनेची उपसरपंच आहे हे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे त्याचा मी निषेध करीत आहे. माझ्यावर विश्‍वास दाखवून चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापक्षाने नियुक्ती केली आहे तो विश्‍वास मी सार्थ ठरविन अशी ग्वाही देखील प्रणिता म्हात्रे यांनी दिली आहे.

Exit mobile version