ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ

पवारांचा बंडखोरांना इशारा

| नाशिक | प्रतिनिधी |

ममी आजही धडधाकट असून आजही पक्ष सांभाळण्यास सक्षम आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला जनमानसात नेणार असल्याचे सांगत ‘ना टायर हूँ, ना रिटायर हूँ’ अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्यातून शरद पवार यांनी टीकेला उत्तर दिले आहे.

पवार हे शनिवारी नाशिक जिल्ह्यात असून येवला येथील सभेसाठी ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना ठणकावलं आहे. ते म्हणाले की, आजही माझी तब्येत सक्षम असून पक्ष पुढे चालविण्यासाठी जोमाने काम करत राहणार आहे. जोपर्यंत आपल्यावर प्रेम करणारी माणसे जवळपास आहेत, तोपर्यंत हा पक्ष पुढे नेण्यांसाठी काम करत राहणार आहे. ‘ना टायर हू, ना रिटायर हू’ असं अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला देत त्यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वय होतं यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देतं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय 84 होतं. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मला वैयक्तिक कुणावरही टीका करायची नाही. मात्र राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांना दहा वर्ष मंत्रिपद दिले. लोकसभेत पराभव होऊनही पटेलांना राज्यसभेत पाठवलं, मात्र मनाविरुद्ध गोष्ट झाली. याचा फैसला मतदारच करतील.

शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष

पुन्हा पावसात भिजले
शरद पवार येवल्याच्या दिशेने जात असताना ते पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं. मागच्या वेळी सातारा येथील सभेत शरद पवार जेव्हा पावसात भिजले होते तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात पाहायला मिळाला होता. आता ते पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी राज्य पिंजून काढताना पावसात भिजले आहेत. याबाबतचा व्हीडीओ रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर व्हायरल केला आहे.

मी आज रस्त्याने येत असताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव मी पाहिले. सामान्य लोकांच्या चेहऱ्यांमधून जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद आहे. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे. त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली. 1986 मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, वेगळा पक्ष निवडला होता. तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केलं होतं. जनार्दन पाटील हे येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही निवडूनही आले होते. त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली होती. त्यावेळी तशी चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला होता असंही आज शरद पवार यांनी सांगितलं.

माझी भूमिका मांडण्याची सुरुवात करण्यासाठी आज मी बाहेर पडलो आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी इथे येत असताना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, सुप्रिया आम्हा सगळ्यांचं लोकांनी स्वागत केलं. आनंद एका गोष्टीचा आहे की वरुणराजाने स्वागत केलं. नाशिक जिल्ह्यात मी आत्ताच विचारत होतो की पावसाची स्थिती काय आहे? मला हे सांगण्यात आलं की रिमझिम आहे. पण पुरेसा पाऊस झालेला नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version