देगावच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा सत्कार
अनेकांचा शेकापक्षात जाहीर प्रवेश
नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तपत्र प्रदान
माणगाव | प्रतिनिधी |
विरोधकांकडे दोन आमदार, एक खासदार असतानाही तुम्ही देगाव ग्रामपंचायत आणली याबद्दल शेकापच्या लढवय्यांचा याचा मला अभिमान वाटतोय, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मोर्बा येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नुकत्याच झालेल्या देगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील नवनिर्वाचित सरपंच सुषमा वाघमारे, उपसरपंच दिनेश गुगळे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली शरद मर्चंडे, संदीप मारुती पवार, संस्कृती संतोष शेलार, श्वेता स्वप्नील गुगळे, योगिता प्रकाश शिगवण, लक्ष्मी राजू कोळी यांचा जाहीर सत्कार, पक्षप्रवेश व नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि.18 नोव्हेंबर रोजी सायकांळी चार वाजता आ. जयंत पाटील यांच्या हस्ते एस.एस. हायस्कूल मोर्बा याठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत, भाऊ सावंत, अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, संचालक ज्ञानेश्वर भोईर, गणेश मढवी, मोर्बा उपसरपंच हसनमिया बंदरकर, आई कनकाई संस्थेचे संस्थापक सुशील कदम, राजिपचे माजी सभापती अशोक गायकवाड, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नुरुद्दीन जालगावकर, उपाध्यक्ष अब्दुल्ला जालगावकर, निजाम फोपळूणकर, माजी सरपंच विलास गोठल, नाझनीन राऊत, माजी उपसरपंच अमोल मोहिते, बशीर किरकिरे, नामदेव शिंदे, स्वप्नील दसवते, मुस्ताक राऊत, कादिर मनेर, एकनाथ गायकवाड, संतोष पाटील, इनायक टाके, रामदास पुराणिक, सुधाकर पवार, प्रीती मोहिते, राबियाम मापकर, रावसाहेब महाडिक, समीर देशमुख आदींसह शेकापचे मोर्बा विभागातील कार्यकर्ते बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत आपल्याशी गद्दारी झाली. मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक झाली. शेकाप संपला असे म्हणणार्या लोकांना दोन महिन्यांपूर्वी झालेल्या व आता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुठलीच पंचायत घेता आली नाही. गेली 50 वर्षे आपली समाजाशी बांधिलकी आहे. गरीब जनता केंद्रबिंदू मानून मी समाजात काम करत आहे. आपण अनेकांना मोठे केले, त्यांना विविध पदांपर्यंत पोहोचविले; परंतु ते आपल्याशी प्रामाणिक राहिले नाहीत.शेकाप सोडून ते दुसर्या पक्षात गेले. आज आलेल्या तरुणांनी माझ्यासोबत एकनिष्ठ राहा, तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही. विकासकामे या भागातील एकही शिल्लक राहणार नाही. ओला दुष्काळ, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याकडे केंद्र सरकारने व खासदारांनी लक्ष दिले पाहिजे. पण, या रस्त्याला कुणीच वाली नाही. मी सभागृहात वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलतो म्हणूनच विविध विकासकामे होत असतात. शेकापचे आम्ही दोन आमदार विधानपरिषदेवर आहोत. माणगाव तालुक्यात आपण चांगल्या प्रकारे संघटना बंधू शकलो याचा अभिमान मला वाटत असून, देगाव ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सर्व तालुक्यातील प्रवेशकर्ते तरुण यांचा विशेष अभिनंदन करून पक्षाचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले की, देगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण थेट जनतेतून सरपंच तसेच उपसरपंच व सदस्य असे एकूण नऊ पैकी सात सदस्य निवडून आणले.थेट जनतेतून सरपंचपदी सुषमा वाघमारे या 344 इतके मताधिक्य घेऊन निवडून आल्या. देगाव ग्रामपंचायतीत शेकापच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असल्याने येथील ग्रामस्थांनी मतदारांनी शेकापशी प्रामाणिक राहात पक्षाला भरभरून यश मिळवून दिले. मोर्बा जिल्हा परिषद गटातही कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. याचे साक्षीदार याठिकाणी आलेला हा सर्व जनसमुदाय असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात भाजपचे माणगाव शहराध्यक्ष राजू मुंढे यांच्यासह माणगाव तालुक्यातील तसेच मोर्बा विभागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शेकापच्या विकासकामांची भारावून शेकापत प्रवेश केल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले.