‘मीच राष्ट्रीय अध्यक्ष’; शरद पवारांचा दावा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शरद पवारांनी आता आपला मोर्चा नवी दिल्लीत हलविला आहे. गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

अजित पवार गटाने शपथविधी होण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाला 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करुन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांऐवजी अजित पवार हेच असल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे पक्षावर तसेच चिन्हावर आपलाच हक्क असल्याचा दावाही केला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानेही तातडीने हालचाल करीत गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अजित पवार गटाचे सदस्य वगळता अन्य सदस्य उपस्थित होते. बैठकीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसे निवडणूक आयोगाकडे आपल्याच नेतृत्वाखालील पक्ष अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्याचे ठरविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून,जे काही होईल ते निवडणूक आयोगापुढेच होईल. वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. मात्र तशी वेळच येणार नाही, असेही त्यानी सुचित केले. 2024 मध्ये जनता महाविकास आघाडीला राज्यात सत्ता मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपला याची किंमत चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.

मी 82 वर्षाचा अथवा 92 वर्षाचा जनतेसाठी लढतच राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान,या बैठकीबाबत अजित पवारांनी आक्षेप घेत ही बैठकच बेकायदा असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version