| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात अजित पवार गटाला शह देण्यासाठी विशेष करुन खा.सुनील तटकरे यांना जिल्ह्यातच आवाहन निर्माण करण्यासाठी आता शरद पवार गटाने कंबर कसली आहे. यासाठी जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शरद पवार गटाचे अस्तित्व राहणार किंवा नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर माजी आ.सुरेश लाड यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लाड यांचे कट्टर समर्थक सुरेश टोकरे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देत रायगडात पुन्हा ताकद वाढवा, असे आवाहन केले.
यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख, तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस वीरेंद्र जाधव, युवक कर्जत तालुका अध्यक्ष सागर शेळके, तालुका उपाध्यक्ष जगदीश ठाकरे, कर्जत माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, नेरळचे माजी उप सरपंच संतोष मिसाळ, विश्वनाथ जामघरे, दर्शन मोडक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.