मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा

| मुंबई | प्रतिनिधी |

गेल्या 15 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असतानाही अद्याप तोडगा निघालेला नसताना 19 सप्टेंबरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आंदोलन सुरू करण्यापूर्वीच नियमभंगाची शक्यता कशी गृहित धरली जाते, असा सवाल करत जरांगेंनी सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

मुंबई पोलिसांनी ‌‘जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम 2025‌’चा नियमभंग होण्याची शक्यता असल्याचे कारण देत आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यामुळे सरकार न्यायदेवतेच्या निर्णयाचा अपमान करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला.

“आंदोलन करण्याआधीच आम्ही नियमभंग करणार आहोत, असे त्यांना का वाटते? कोणत्या कायद्याने राज्य चालवत आहात? राज्यात ही काय अस्थिरता आहे?” असे सवाल जरांगेंनी उपस्थित केले. मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच. पोलिसांच्या परवानगीबाबत वकील बांधव निर्णय घेतील. आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करणार आहोत. न्यायदेवतेने कोणालाही आम्हाला रोखता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे, असे जरांगे म्हणाले. 15 सप्टेंबरला मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगत 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर शांततेत बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, आजपासून सलाईन, पाणी आणि उपचार सर्व बंद करत आहे, असेही जरांगे यांनी सांगितले.

Exit mobile version